सारनाथ सिंह स्तंभशीर्ष / अशोक स्तंभ

सारनाथ सिंह स्तंभशीर्ष :

         बुद्धांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर पहिले धर्मप्रवचन सारनाथ येथे केले. या घटनेचे स्मारक म्हणून सम्राट अशोकाने इ.स. २४०च्या सुमारास त्या ठिकाणी एक स्तंभ उभारला होता. तेथे करण्यात आलेल्या उत्खननात स्तंभाचे तुटलेले भाग व बऱ्याच प्रमाणात शाबुत असलेले स्तंभशीर्ष सापडले. पाठीला पाठ असलेल्या या चार सिंहाच्या डोक्यावरती आणखी एक मोठे चक्र होते. ते शेजारीच तुकड्यांच्या अवशेषाच्या स्वरूपात आढळून आले. हे स्तंभशीर्ष व अवशेष सारनाथच्या पुराण वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.



          सिंह स्तंभशीर्षाचे तीन मुख्य भाग सहज लक्षात येतात. सर्वात खाली घंटेच्या आकाराचे उलटे कमळ व त्यावर दोन कडी आहेत. खालच्या बाजूचे कडे लहान तर वरच्या बाजूचे कडे आकाराने थोडे मोठे आहे. त्याच्यावरील दुसरा भाग म्हणजे चारही कोपरे कापलेल्या चौकोनी आकाराचा स्तंभशीर्ष फलक होय. हा आकार अनियमित अष्टकोनी आहे. वरील तिसरा महत्त्वाचा भाग पुढील पायावर तोल सांभाळून व पाठीला पाठ लावून बसलेल्या चार सिंहांच्या आकृतीचा आहे. या शिल्पातील घंटेच्या उलट्या आकाराचे कमळ इराणमधील दरायसच्या राजवाड्यातील स्तंभावरून घेतलेले आहे असे मानले जाते. या कमळाच्या पाकळ्या सरळ खाली पडलेल्या आहेत. सारनाथच्या स्तंभशीर्षामधील पाकळ्यांची घडण बाकदार, वक्र रेषांची व अलंकृत आहे. त्यामुळे ती अधिक मनोहर व चैतन्यपूर्ण बनली आहे. स्तंभशीर्ष फलकाच्या जाडीच्या बाजूवर चारी दिशांना चार धर्मचक्रे कोरलेली आहेत. या ठिकाणी प्रथमतः धर्मचक्र परिवर्तन केले. त्यामुळे चक्राचे आकार कोरण्यात आले असावे. प्रत्येक दोन धावत्या प्राण्यांच्यामध्ये एक धर्मचक्र याप्रमाणे बैल, घोडा, सिंह, हत्ती या चार प्राण्यांची सुरेख शिल्पे उठावात कोरली आहेत. हे प्राणी धावत्या अवस्थेत दाखवण्याचा हेतू धर्मचक्राची गती सूचित करण्याचा असावा या उद्देशाखेरीज त्या प्राण्यांची प्रतीकात्मतादेखील लक्षणीय आहे. 

         बौद्ध धर्मात या चार प्राण्यांना प्राप्त झालेले महत्त्व बुद्धाच्या जीवनाशी असलेल्या त्यांच्या संबंधांमुळे आहे. गौतमाच्या गर्भवती आईला स्वप्नात एक श्वेत हत्ती दिसला व गौतमाचा जन्म वृषभ राशीत झाला. त्यामुळे हत्ती व बैल यांना बुद्धाची प्रतीके म्हणून धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. तसेच कंटक नावाच्या घोड्यावर बसून तो सर्वस्व त्याग करून निघून गेला म्हणून घोड्याला महत्त्व मिळाले. त्याच पद्धतीने सिंह हा राजऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे बौद्ध धर्मात सिंहाला बुद्धाचे प्रतीक मानले जाऊ लागले. या चार प्राण्यांंचे वास्तव व जोशपूर्ण कोरीव काम हे ग्रीक शिल्पातील प्राण्यांच्या आकृतींचे स्मरण करून देते. चार दिशांना चार तोंडे असलेले सिंह चारही दिशांना बौद्ध धर्माचा संदेश प्रसारित करीत आहेत असे जाणवते तसेच सिंह हा राजसत्तेचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो. सिंहाला सूर्याचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. अज्ञानरूपी काळोखाला नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र प्रसारित करण्यासाठीही सिंहाच्या प्रतिमा वापरण्यात आल्या असाव्यात. सिंहाच्या चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांचा त्रिकोणी आकार आणि विशेषतः या शिल्पावरील चकचकीत झिलई हे विशेष इराणी सिंह-शिल्पात आढळतात. या चकचकीत झिलईसाठी इराणी शिल्पकार भारतात वास्तव्यास होते हे लक्षात येते. सिंहाच्या डोक्यावर एक धर्मचक्र होते त्याचे अवशेष सापडले आहेत. त्यावरून धर्मप्रसाराचा हेतू स्पष्ट होतो. हा स्तंभशीर्ष चुनार खाणीतील एकसंध पिवळ्या वालुकाश्मात कोरला आहे.

            सर्वधर्म समभाव बाळगणाऱ्या सहिष्णु व उदारमतवादी भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे हे लक्षात घेऊन या शिल्पाला राजमुद्रा म्हणून स्वीकारण्याचे औचित्य स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने दाखवले ते सर्वथा योग्यच आहे.

Comments