सारनाथ सिंह स्तंभशीर्ष / अशोक स्तंभ
सारनाथ सिंह स्तंभशीर्ष : बुद्धांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर पहिले धर्मप्रवचन सारनाथ येथे केले. या घटनेचे स्मारक म्हणून सम्राट अशोकाने इ.स. २४०च्या सुमारास त्या ठिकाणी एक स्तंभ उभारला होता. तेथे करण्यात आलेल्या उत्खननात स्तंभाचे तुटलेले भाग व बऱ्याच प्रमाणात शाबुत असलेले स्तंभशीर्ष सापडले. पाठीला पाठ असलेल्या या चार सिंहाच्या डोक्यावरती आणखी एक मोठे चक्र होते. ते शेजारीच तुकड्यांच्या अवशेषाच्या स्वरूपात आढळून आले. हे स्तंभशीर्ष व अवशेष सारनाथच्या पुराण वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. सिंह स्तंभशीर्षाचे तीन मुख्य भाग सहज लक्षात येतात. सर्वात खाली घंटेच्या आकाराचे उलटे कमळ व त्यावर दोन कडी आहेत. खालच्या बाजूचे कडे लहान तर वरच्या बाजूचे कडे आकाराने थोडे मोठे आहे. त्याच्यावरील दुसरा भाग म्हणजे चारही कोपरे कापलेल्या चौकोनी आकाराचा स्तंभशीर्ष फलक होय. हा आकार अनियमित अष्टकोनी आहे. वरील तिसरा महत्त्वाचा भाग पुढील पायावर तोल सांभाळून व पाठीला पाठ लावून बसलेल्या चार सिंहांच्या आकृतीचा आहे. या शिल्पातील घंटेच्या उलट्या आकाराचे कमळ इराणमधील दरायसच्या राजवाड्यातील स्तंभावरून